जळगाव, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा मार्गावरील जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यावेळी एक ट्रक आणि मुंबई-अमरावती एक्स्प्रेस यांच्यात धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.14) पहाटे घडली. या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
https://x.com/ANI/status/1900413956189282620?t=mjoeDeTPmjiQiV3zdQ88vQ&s=19
अशी घडली घटना
प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे फाटक बंद असतानाही एका भरधाव ट्रकने नियमांचे उल्लंघन करून फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुंबई-अमरावती एक्स्प्रेस तेथून जात होती. यादरम्यान सदर रेल्वेने त्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचे मोठे नुकसान झाले, परंतु ट्रकचालक आणि इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
वाहतूक पुन्हा सुरळीत
या अपघातानंतर रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. उशिरापर्यंत अपघातग्रस्त ट्रक हटवण्याचे काम सुरू होते. अखेर सकाळी 8.50 वाजता रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आणि वाहनचालकांना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे फाटक बंद असताना कोणत्याही परिस्थितीत ते ओलांडू नये, अन्यथा गंभीर अपघात होऊ शकतात, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच या अपघाताचा तपास सध्या केला जात आहे.