दिल्ली, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्स्प्रेस रेल्वेचे अपहरण झाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर निराधार आरोप केले आहेत. मात्र, भारताने हे आरोप ठामपणे फेटाळले असून, पाकिस्तानने स्वतःच्या समस्यांसाठी इतरांना जबाबदार धरण्याचे धोरण बंद करावे, असा स्पष्ट इशारा भारताने दिला आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले आहे.
https://x.com/MEAIndia/status/1900387522066186696?t=dewp23by26XfL1VrnMxh3A&s=19
भारताचे जोरदार प्रत्युत्तर
“पाकिस्तानने केलेले आरोप निराधार असून, आम्ही त्यांना ठामपणे फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचे दोष इतरांवर ढकलण्याऐवजी स्वतःकडे पाहावे.” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे.
रेल्वेचे अपहरण झाले होते
11 मार्च 2025 रोजी बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने बलुचिस्तानमधील जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केले होते. या रेल्वेत 400 हून अधिक प्रवासी होते, ज्यापैकी अनेक जण पाकिस्तानी लष्कर, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय शी संबंधित होते. या घटनेनंतर पाकिस्तानने भारतावर बंडखोरांना मदत केल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानचा आरोप
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाने भारतावर कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत, “भारत बलुच बंडखोरांना पाठिंबा देत आहे,” असे वक्तव्य केले होते. मात्र, पाकिस्तानकडून या आरोपांना कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर पाकिस्तानी लष्कराने बचाव मोहीम राबवली. या मोहिमेत 155 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून, सुमारे 27 बलुच बंडखोर ठार झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानची रणनीती
दरम्यान, भारतावर अशा प्रकारचे आरोप करणे, ही पाकिस्तानची नेहमीची रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये अनेकदा अंतर्गत दहशतवादी हल्ले, बंडखोरांचे हल्ले आणि सुरक्षा अपयश दिसून येते. मात्र, त्याचा दोष इतर देशांवर, विशेषतः भारतावर लादण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो. भारताने पाकिस्तानच्या या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानला स्वतःच्या देशातील बंडखोर गटांचा सामना करावा लागतो आहे आणि हे त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अपयश दर्शवते.