राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आज (दि.09) तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत. तत्पूर्वी राहुल नार्वेकर यांनी रविवारी (दि.08) विधानसभा अध्यक्षपदासाठी एकमात्र अर्ज दाखल केला होता. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला नव्हता. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी ही घोषणा केली आहे.

https://x.com/ANI/status/1866001842880254298?t=ShPa5LIexj9x-g6LILMVGg&s=19

सलग दोनदा अध्यक्षपदी निवड

राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. देशातील कोणत्याही राज्याचे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले नार्वेकर हे सर्वात तरूण व्यक्ती आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेना पक्षासोबत केली होती. मात्र 2014 मध्ये राहुल नार्वेकर यांना शिवसेनेने लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारले. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने कुलाबा मतदारसंघातून त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक देखील जिंकली. आता राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे.

आमदारांचा शपथविधी पार पडला

राज्यात सध्या विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडत आहे. या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह 105 सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांच्या आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ न घेण्याची भूमिका घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *