दिल्ली, 08 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे जगभरातील विविध नेत्यांनी अभिनंदन केले आहे. तर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक पत्र लिहिले आहे. “भारत आणि अमेरिका यांची ऐतिहासिक मैत्री आहे. जी लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेवर आधारित आहे. तुमच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे की आपले देश परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवतील.” असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
https://x.com/AHindinews/status/1854744744855060990?t=4c3wQpQCuCjvYbYTsZ5WbA&s=19
राहुल गांधींनी पत्रात काय म्हटले?
“युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. अमेरिकेतील जनतेने भविष्यासाठी तुमच्या व्हिजनवर विश्वास ठेवला आहे. भारत आणि अमेरिका यांची ऐतिहासिक मैत्री आहे, जी लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेवर आधारित आहे. तुमच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे की आपले देश परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवतील. मला आशा आहे की आम्ही भारतीय आणि अमेरिकन दोघांसाठीही मार्ग आणि संधी वाढवण्याच्या दिशेने काम करत राहू. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून तुमच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.” असे राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प 538 पैकी 277 इलेक्टोरल मते मिळाली. तर कमला हॅरिस यांना 224 मते मिळाली आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.