दिल्ली, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे नियमानुसार राहुल गांधी यांना वायनाड किंवा रायबरेली या दोन्ही जागांपैकी कोणत्या तरी एका जागेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यामुळे राहुल गांधी कोणत्या मतदारसंघाची खासदारकी सोडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राहुल गांधी यांनी सोमवारी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर वायनाड लोकसभा मतदारसंघातून आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या पोटनिवडणूक लढविणार आहेत.
https://www.instagram.com/reel/C8Ux7UxSi6H/?igsh=MXJtb2VrcHMwbW9oMg==
वायनाडचा राजीनामा देणार
तत्पूर्वी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा देण्याबाबत आणि त्याच मतदारसंघात प्रियंका गांधी यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. दरम्यान, त्यानिमित्ताने प्रियंका गांधी या प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून कायम राहतील.
हा निर्णय घेणे खूप कठीण होते
हा निर्णय झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रायबरेली आणि वायनाड या दोन्ही भागातील लोकांशी माझे विशेष नाते आहे. त्यामुळे हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. वायनाडचा खासदार या नात्याने मला तिथल्या माझ्या कुटुंबाकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा मी जपून ठेवला आहे. प्रियंका वायनाडमधून निवडणूक लढवणार असून, रायबरेलीचे प्रतिनिधित्व करताना मला आनंद होत आहे. वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी आता दोन प्रतिनिधी आहेत जे त्यांच्या प्रगतीसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. आमचे दरवाजे तुम्हा सर्वांसाठी सदैव खुले आहेत. असे राहुल गांधी म्हणाले.