राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती! लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता

दिल्ली, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज 18 व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. यासंदर्भात संसद भवनाने बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. “लोकसभा अध्यक्षांनी संसद कायदा, 1977 मधील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे वेतन आणि भत्ते कलम 2 नुसार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 9 जून 2024 पासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाली आहे,” असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

https://x.com/ANI/status/1805902829292593489?s=19

दहा वर्षानंतर विरोधी पक्षनेते पद!

गेल्या 10 वर्षांमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. तर 10 वर्षानंतर आता लोकसभेला राहुल गांधी यांच्या रुपाने विरोधी पक्षनेता मिळाला आहे. तत्पूर्वी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी विरोधी पक्षाला लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी किमान दहा टक्के म्हणजेच 55 जागा जिंकणे आवश्यक असते. परंतु, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने फक्त 52 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे 16 व्या आणि 17 व्या लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याची निवड करता आली नाही. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले आहे.

गांधी घराण्यातील तिसरे व्यक्ती

दरम्यान 54 वर्षीय राहुल गांधी 2004 पासून खासदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत प्रथमच इतकी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारणारे राहुल गांधी हे गांधी घराण्यातील तिसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी, राजीव गांधी यांनी 1989-90 मध्ये व्हीपी सिंह यांच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर 1999-2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राहुल गांधी यांना लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पद संभाळण्याची संधी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *