राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर! अमेठीतून काँग्रेसचा उमेदवार ठरला

दिल्ली, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस पक्षाने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार, राहुल गांधी यावेळी रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी मतदारसंघातून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. अमेठीतून भाजपने स्मृती इराणी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी या अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना या जागेवर तिकीट दिल्यामुळे प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

https://twitter.com/INCIndia/status/1786218950503899139?s=19

राहुल गांधी यंदाही दोन जागांवर उभे

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी 2004 मध्ये अमेठीतून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. यानंतर ते सलग तीन वेळा अमेठीतून खासदार झाले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघांत राहुल गांधी यांचा भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. मात्र, त्याचवेळी राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवली होती. तेंव्हा वायनाडच्या जागेवर राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. दरम्यान, राहुल गांधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहेत.

20 मे रोजी मतदान

दरम्यान, रायबरेलीची जागा सोनिया गांधी 2004 पासून जिंकत आल्या आहेत. मात्र, सोनिया गांधींनी यावेळेस लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. तर वायनाडमध्ये दुसरा टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी या दोन्ही जागांवर विजय मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *