बारामती, 30 मेः बारामती एमआयडीसीमधील एका नामांकित कंपनीतील कामगारावर जातीवाचक शिवीगाळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर कामगारावर त्याच कंपनीतील मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ देत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले जात आहे.
सदर घटना ही बारामती एमआयडीसीमधील श्राबर डायनामिक्स कंपनीत एका कामगारासोबत घडली आहे. कर्मचारी हा गेल्या 15 वर्षांपासून सदर कंपनीत खासगी कॉन्ट्रेक्टरमार्फत लेबर म्हणून पॅकींग साईटवर काम करीत आहे. सदर कंपनीतील मॅनेजमेंटचे अधिकारी सातत्याने अनुसूचित जातीच्या कामगारांना जातीय द्वेषापोटी त्रास देवून कंपनी सोडण्यास भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, पहिल्या शिफ्टमध्ये कामासाठी गेले असता कंपनी मॅनेजमेंट अधिकारी ज्ञानेश्वर गिरवले यांनी कंपनीतील पाण्याच्या टाकीसमोर पीडित कामगाराला बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ‘कंपनीत कायमस्वरुपी करणार नाही, काम करायचा विषय सोडून दे’, असे म्हणत कामगाराला जाण्यास सांगितले.
पुन्हा कामावर जाताना मॅनेजमेंट अधिकारी रावसाहेब मोकाशी यांच्या कॅबीनमध्ये बोलावून रावसाहेब मोकाशींनी पीडित कामगाराला दमदाटी करत कंपनी सोडण्यासाठी दम दिला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून हाकलून दिले. तसेच सदर प्रकार कोणास सांगितला तर मारेकरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप पीडित कामगाराने केला आहे. सदर प्रकरानंतर पीडित कामगाराने झालेल्या प्रकाराबाबत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.