मुंबई, 19 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन वन इलेक्शन’ ला मान्यता दिली आहे. त्यानंतर या संदर्भात राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या राज्यात सरकार कोसळले तर त्या राज्यात कधी निवडणूक होणार? तसेच लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर त्यावेळी विधानसभेच्या देखील निवडणुका होणार का? यांसारखे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच राज ठाकरे यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी देखील केली आहे.
https://x.com/RajThackeray/status/1836400873469047223?s=19
राज ठाकरे काय म्हणाले?
“एक देश एक निवडणूक या संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही,” याची खातरजमा पण व्हायलाच हवी, असे राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आधी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या
बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळले किंवा किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल. असो… पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन 4 वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचे नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचे कोणाकडे? निवडणुकांचे महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असे राज ठाकरे यांनी यामध्ये म्हटले आहे.