बारामती, 25 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) बारामती परिसरातील एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल मधील एमबीबीएस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच गुंडागर्दी केल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी मधील महिला हॉस्पिटल समोरील तळ्याच्या शेजारी काही विद्यार्थी चहा पाण्याला गेले होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांची जयशंकर गरड या युवकाबरोबर किरकोळ कारणावरून वादावादी झाली. या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले.
युवकाला बेदम मारहाण
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सुनील महतो व अब्दुल खान यांनी व त्यांच्याबरोबर असणाऱ्या साथीदारांनी मिळून त्या युवकला बेदम मारहाण करून त्याला मारत आपल्या गाडीवर बसवून वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर आणून त्याला पुन्हा बेदम मारहाण केली, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय महाविद्यालयाने सांगितले आहे. हा गंभीर प्रकार घडत असताना सिक्युरिटी गार्ड फक्त बघायची भूमिका घेत असल्याचे तेथील कर्मचारी वर्ग सांगत आहे. सिक्युरिटी गार्ड वाल्यांनी वाद सोडवला असता तर ही घटना घडली नसती, असे तेथील कर्मचाऱ्यांनी भारतीय नायक शी बोलताना सांगितले आहे.
संबंधित विद्यार्थ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थ्यांच्या विरोधात गंभीर दुखापत करणे व जमावाने मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर सदरील गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मेहेर हे करीत असल्याचे समजले आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकारी सांगत आहेत. सदरच्या गुन्ह्यामध्ये आणखी काही विद्यार्थी सहभागी असतील तर, त्यांच्यावरही पोलीस कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सदरच्या गुन्ह्या मधील आणखी काही बाबी लवकरच भारतीय नायक लोकांसमोर प्रसिद्ध करणार आहे.