पुणे, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे या पदी बदली करण्यात आली आहे. डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी असताना पुणे जिल्ह्यात आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पडली असून, त्यांच्या कार्यकाळात विविध प्रशासनिक सुधारणा आणि जनकल्याण योजनांचा लाभ पुणेकरांना मिळाला. त्यांच्या कार्यकाळातील अनेक उपक्रमांची शहरवासीयांनी प्रशंसा केली आहे.
जितेंद्र दुडी नवे जिल्हाधिकारी असतील
पुणे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. सुहास दिवसे यांची बदली होताच, साताऱ्याचे विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जितेंद्र डुडी हे एक अनुभवी अधिकारी असून, त्यांना जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी साताऱ्यात देखील आपल्या कार्यकाळात विविध सामाजिक आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी ठोस पाऊले उचलली आहेत.
जितेंद्र डुडी हे लवकरच पुणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारताना जितेंद्र डुडी यांना सर्व विभागीय अधिकारी व नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. आगामी काळात पुणे शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.