पुणे, 14 जुलैः पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पुण्यासह सहा जिल्ह्यांना अति वृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे 14 आणि 15 जुलै रोजी पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरातील पहिली ते दहावीच्या शाळा बंद राहणार आहेत. तसेच या दोन्ही शहरातील ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यासही सांगितले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही आपत्ती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे कधी बंद न होणारे पुणे मुसळधार पावसामुळे बंद होणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पुणे महानगर पालिकेसह पिंपरी चिंचवड महानगर पालिकेनेही शहरातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णय संदर्भात पिंपरी चिंचवड मनपाने परिपत्रकही काढले आहे. दरम्यान, दोन्ही शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहण्यास मिळत आहे. तर काही ठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटनाही झाल्याचे वृत्त आहे.