बारामती, 20 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि विद्या प्रतिष्ठान बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यांतून सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
https://x.com/Dwalsepatil/status/1814581056177095155?s=19
https://x.com/iAditiTatkare/status/1814670698389930250?s=19
बक्षीस वितरण सोहळा संपन्न
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे विशेष कौतुक करत विजेत्यांचे अभिनंदन केले. शाश्वत विकास साधताना सायकलचा अधिकाधिक वापर करणे हे निसर्गाच्या आणि पर्यायाने आपल्या सर्वांच्या हिताचे असल्याचे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
पुणे ते बारामती सायकल स्पर्धा
गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय सायकल स्पर्धा दरवर्षी साजरी करण्यात येत आहे. यंदा या स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. तीन प्रकरांत ही स्पर्धा पार पडली. यामध्ये पुरूषांसाठी पुणे ते बारामती (122 किमी), सासवड ते बारामती (85 किमी) आणि महिलांसाठी माळेगाव ते बारामती (12 किमी) राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
https://x.com/mohol_murlidhar/status/1814527359032184905?s=19
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
तत्पूर्वी, या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यातील शनिवारवाडा येथे करण्यात आले. देशभराच्या विविध राज्यातून सायकलपटू यात सहभागी झाले असून, या स्पर्धेची व्याप्ती आणखी व्यापक होत आहे. पुण्यातून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला राष्ट्रीय पातळीवर सायकलिंग क्षेत्रात मान्यता मिळत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी म्हटले आहे.
अनेक मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटनप्रसंगी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, उपमहापौर मुकारी अलगुडे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, एशियन सायकलिंगचे महासचिव ओंकार सिंग यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, विविध मान्यवर, सायकलपटू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात या सर्वांचे स्वागत यावेळी करण्यात आले होते.