पुणे, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे स्वारगेट बसस्थानक याठिकाणी झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला पुणे क्राईम ब्रँचच्या पथकाने शिरूर तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेतले आहे. आता त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.28) दिली आहे. पुणे शहर पोलीस विभागाच्या झोन 2 च्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे या आरोपीला औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1895297176886223057?t=FaJQ1-fmbtoQBnjkcCr7Tg&s=19
अशी घडली घटना
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना मंगळवारी (दि.25) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, पीडित तरूणी कामानिमित्त पुण्यात राहत असून ती त्या दिवशी आपल्या मूळ गावी सातारा तालुक्यातील फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात बसची वाट पाहत होती. त्याचवेळी आरोपीने पीडित तरूणीशी ओळख वाढवून तिला फसवून सांगितले की, ती ज्या गावाला जाणार आहे, त्या मार्गावरील बस दुसरीकडे लागली आहे. असे सांगून आरोपीने या तरूणीला डेपोत थांबलेल्या एका बसमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.
पोलिसांना मोठे यश
या प्रकारानंतर आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी पीडित तरूणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. दत्तात्रय गाडे असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली. परंतु, गुन्हा घडल्यापासून हा आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर केले होते. अखेर पोलिसांनी या आरोपीला शिरूर तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे. पुणे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केली. दरम्यान, या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या सर्व स्तरांतून केली जात आहे.