पुण्यात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

पुणे, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात कोयता हातात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्याच्या 9 घटनांची नोंद झाली असून, या प्रकरणात 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 13 जण हे अल्पवयीन आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. तसेच पुण्यात कोणतीही “कोयता गॅंग” अस्तित्वात नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सोबतच पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

https://x.com/CMOMaharashtra/status/1901993137784168822?t=9NjLuoDKg1XWsoJdGsLLug&s=19

अल्पवयीन मुलांसाठी ‘दिशा’ उपक्रम

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, अशा गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने 15 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांचा सहभाग असल्याचे आढळले आहे. या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी पुण्यात ‘दिशा’ हा विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत काही बालकांचे पुनर्वसन यशस्वीपणे करण्यात आले आहे.

सात नवीन पोलीस ठाणे सुरू होणार

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सात नवीन पोलीस ठाणी सुरू करणार आहे. त्यानुसार खराडी, वाघोली, नांदेड फाटा, आंबेगाव, काळेपडळ, फुरसुंगी आणि बाणेर या ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि पोलीस ठाण्याच्या हद्दी मोठ्या असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास अडचणी येत होत्या. नवीन पोलीस ठाण्यांमुळे कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल.

गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, काही सराईत गुन्हेगार हे अल्पवयीन बालकांचा गैरवापर गुन्हेगारीत करत असल्याचे आढळून आले आहे. नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेनुसार, जर कोणी अल्पवयीन बालकांचा वापर गुन्ह्यांसाठी केला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधित बालकांचा गुन्हा हा त्या सराईत गुन्हेगारांचाच मानला जाणार असून, त्यांना कठोर शिक्षा होईल. दरम्यान, पुण्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *