पुणे, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना आखल्या आहेत. नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
https://x.com/ANI/status/1873265968165855415?t=oIqK6KVAWYkc4aPEBNFHQg&s=19
एसपी पंकज देशमुख काय म्हणाले?
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी पर्यटक आणि तरूणाई मोठ्या प्रमाणावर जमण्याची शक्यता असते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. यावेळी पोलिसांच्या विविध पथकांना प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पंकज देशमुख यांनी यावेळी सांगितले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या काळात ड्रिंक अँड ड्राईव्ह ची परिस्थिती टाळण्यासाठी पोलिसांकडून तपासणी करण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी नाकाबंदी केली आहे. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाचे पथक कडक कारवाई करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि अपघातांची संख्या कमी करणे हा त्यामागील उद्देश असल्याचे पंकज देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दरवर्षीप्रमाणे 31 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक व तरुणवर्ग येतो. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक ठिकाणी गस्त, तसेच निर्बंधांचे पालन करण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. पर्यटक व नागरिकांनी संयम आणि जबाबदारीने नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.