पुणे, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.28) पत्रकार परिषद घेतली. या आरोपीला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी विशेष वकील नेमला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
https://x.com/ANI/status/1895355815630119265?t=SvuQsy7XdH2Zk5iPTEVQBQ&s=19
आयुक्तांनी दिली माहिती
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले की, “आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन दिवस मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. या मोहिमेत 500 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. विशेष म्हणजे, गुणाट गावातील 400 ते 500 नागरिकांनी या शोध मोहिमेत पोलिसांची मदत केली. तसेच श्वान पथक व ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने तपासाला वेग आला आणि अखेर या आरोपीला मध्यरात्री 1.10 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.”
आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न
आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू असून, हा गुन्हा लवकरात लवकर निकाली निघावा म्हणून विशेष वकील नेमला जाणार आहे. “आम्ही हा खटला जलदगतीने चालवण्याचा प्रयत्न करू, तसेच भविष्यात असे गुन्हे होऊ नयेत यासाठी उपाययोजना करत आहोत,” असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
गावकऱ्यांचा सन्मान होणार
दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुणाट गावातील नागरिकांनी दिलेल्या मदतीबद्दल त्यांचे पुणे पोलिसांच्या वतीने आभार मानले. “मी स्वतः गावाला भेट देऊन नागरिकांचा सन्मान करीन,” असे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले आहे.
प्रकरण काय आहे?
मंगळवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात हा प्रकार घडला. ही पीडित तरूणी फलटण येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. आरोपीने तिला चुकीची माहिती देऊन डेपोतील एका बंद उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.