पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण; ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टर निलंबित

पुणे, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपावरून पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांना तसेच एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तर रुग्णालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या एसआयटी समितीने केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हलनोर असे या निलंबित केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. हे दोन्ही डॉक्टर सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1795817026763768041?s=19

https://twitter.com/airnews_mumbai/status/1795796157165113632?s=19

आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार

या अपघातातील आरोपी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. तत्पूर्वी, या अपघातावेळी हा अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता. या आरोपीच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी डस्टबिनमध्ये फेकून दिले. तसेच त्यांनी दुसऱ्याच्या रक्ताच्या नमुन्याच्या आधारे वैद्यकीय अहवाल तयार केला. यामध्ये दारूचा कसलाही अंश सापडला नाही. या अहवालाच्या आधारे या अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, हे प्रकरण तापल्यानंतर या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

आतापर्यंत 10 जण अटकेत

दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोर्श कारने एका दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पुणे पोर्शे अपघातप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा, पबचे मालक, डॉक्टर यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात आणखी काही जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाचा सध्या तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *