मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तरूण आणि तरुणीच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकारने 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रकमेचा धनादेश आज सदर अपघातातील मृत मुलांच्या पालकांना सुपूर्द केला. याप्रसंगी मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुणे युवासेना सचिव किरण साळी आणि पीडित कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.
https://x.com/ANI/status/1805581196941725716?s=19
जामीन मिळाला असला तरीही सर्व दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलांच्या पालकांना दिली. तत्पूर्वी, पुणे शहरातील पोर्श कार अपघात प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असे स्पष्ट केले होते. तसेच याप्रसंगी त्यांनी ह्या अपघात प्रकरणातील दोन्ही मृत मुलांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 जून रोजी रात्री उशीरा हा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरूण-तरूणीचा मृत्यू झाला होता. तर या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज मुंबई हायकोर्टाने जामीन दिला आहे. त्यामुळे त्याची आता बाल सुधारगृहातून सुटका होणार आहे. या मुलाच्या जामिनासाठी त्याच्या आत्त्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.