पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी समितीचा तपास सुरू

पुणे, 29 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी समिती स्थापन केली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षपदी जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पल्लवी सापळे यांनी काल पुणे आयुक्तालयात पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच यावेळी त्या पुण्यातील कार अपघातातील डॉक्टरांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयात गेल्या होत्या.

https://twitter.com/ANI/status/1795464995985371465?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1795363109260943483?s=19

समिती प्रमुख काय म्हणाल्या?

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने माझ्यासह एक समिती स्थापन केली आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. आम्हाला हॉस्पिटलकडून सविस्तर माहिती मिळाली. आम्हाला कल्याणीनगरच्या घटनेसंदर्भात ससून हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करायची आहे. हे नियमानुसार झाले की नाही? हे आम्हाला शोधायचे आहे. याचा तपास केल्यानंतर आम्ही सरकारला यासंदर्भातील अहवाल सादर करू. सरकारने आम्हाला लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे. आम्ही काय चौकशी केली ते गोपनीय राहते. त्यामुळे आम्ही याबाबत अधिक भाष्य करू शकणार नाही.” असे पल्लवी सापळे यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1795395312519123054?s=19

पोलीस कोठडीत वाढ

तत्पूर्वी, पुणे कार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी पहिल्या दिवसापासून या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांच्या संपर्कात आहे. दोषींना सोडले जाणार नाही. मी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, पुण्यातील पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय पुणे जिल्हा न्यायालयाने घेतला आहे. त्यानुसार, न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या ड्रायव्हरने हा गुन्हा स्वतःवर घ्यावा, यासाठी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात न्यायलयाने त्यांना आता पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *