पुणे, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप आहेत. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. दरम्यान या अपघातावेळी हा मुलगा मद्यधुंद अवस्थेत वेगात कार चालवत होता.
https://twitter.com/ANI/status/1797181741804724655?s=19
https://twitter.com/ANI/status/1797161889379537107?s=19
रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप
मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार दिल्याप्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला काल पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या वडिलांना पोलिसांनी आज येरवडा मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलाने पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्या मुलाच्या रक्तामध्ये दारूचा अंश सापडू नये, यासाठी त्यांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सोबत घेऊन त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. याचीच सध्या पोलीस चौकशी करीत आहेत.
आई, वडील, आजोबा अटकेत
या प्रकरणात ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांना तसेच एका वार्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली गेली आहे. या तिघांना कोर्टाने 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी सध्या बाल सुधारगृहात आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत आरोपीचे आई, वडील, आजोबा, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्ड बॉय यांच्यासह पुण्यातील पब मॅनेजमेंट टीममधील काही जणांना अटक करण्यात आली आहे.