पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक!

पुणे, 01 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील पोर्शे कार अपघातात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक केली आहे. याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. आरोपी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून ते नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा त्याच्या आईवर आरोप आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तिला ताब्यात घेतले आहे. शिवानी अग्रवाल असे त्याच्या आईचे नाव आहे. सध्या याप्रकरणात पोलीस तिची चौकशी करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1796730183971664225?s=19

रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप

तत्पूर्वी, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असून तो या अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत वेगात कार चालवत होता. या अपघातानंतर पोलिसांनी या आरोपी मुलाला अटक केली आणि त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेले. परंतू, या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने येथील 2 डॉक्टरांनी बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात दोन्ही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने फेकून देऊन त्याच्याजागी आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिच्या रक्ताचे नमुने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तिने डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप आहे. या आरोपांवरून शिवानी अग्रवाल हिला आज गुन्हे शाखेने अटक केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1796533624281649648?s=19

आज आरोपीची चौकशी होणार

तर दुसरीकडे या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा या दोघांनाही कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना काल कोर्टात हजर करण्यात आले होते. आरोपीच्या ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांना बाल न्याय मंडळाकडून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, पुणे पोलिसांचे पथक आज बाल सुधारगृहात या अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी जाणार आहेत. यावेळी पोलिसांना त्याची चौकशी करण्यासाठी 2 तासांचा वेळ मिळाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *