मुंबई, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी त्याच्या सुटकेसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निर्णय राखून ठेवला आहे. तर आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 25 जून रोजी जाहीर होणार आहे. या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्ट त्याच्या जामिनावर निर्णय देणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/ANI/status/1804060475740819751?s=19
हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला
या प्रकरणी सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने म्हटले की, “या घटनेमुळे अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच दारूच्या नशेत हा अपघात घडवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला देखील धक्का बसला आहे. साहजिकच या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाला असावा.” यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. दरम्यान, 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील तरूण आणि तरूणीचा मृत्यू झाला होता. सदर अपघातावेळी हा मुलगा मद्यधुंद अवस्थेत वेगात पोर्श कार चालवत होता. तसेच त्याच्या कारला त्यावेळी नंबर प्लेट देखील नसल्याचे समोर आले होते. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी सध्या बाल सुधारगृहात आहे.
आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार
तर या अपघातानंतर या अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. या अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलाने पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्या मुलाच्या रक्तामध्ये दारूचा अंश सापडू नये, यासाठी त्यांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सोबत घेऊन त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. सध्या या आरोपीचे आई-वडील पोलीस कोठडीत आहेत.
आजोबासह अनेकजण अटकेत
तर हा अपघात झाल्यानंतर या अल्पवयीन मुलाच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी या आरोपीच्या आजोबाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. नातवाच्या अंगावरील गुन्हा आपल्या अंगावर घ्यावा, यासाठी या आरोपीच्या आजोबाने ड्रायव्हरला मारहाण करून त्याच्यावर दबाव आणला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या आजोबाला अटक केली होती. तेंव्हापासून त्याचा आजोबा तुरूंगात आहे. याशिवाय ह्या अपघात प्रकरणात आतापर्यंत आरोपीचे आई, वडील, आजोबा यांच्यासह ससून रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि पुण्यातील पब मॅनेजमेंट टीममधील काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच येरवडा पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.