पुणे, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर पोलिसांनी तब्बल 10 लाख 35 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पुणे शहरातील सहकारनगर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 10 लाख 35 हजार रुपयांच्या 2070 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
https://x.com/PuneCityPolice/status/1879934921697034696?t=NMOFn03ddqMyGhfPNpmjgQ&s=19
सर्वप्रथम पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक रात्री गस्त घालत होते, त्यावेळी पोलिसांनी एका संशयित इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटांचा बंडल सापडला, त्यावेळी प्राथमिक तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
पाच जणांना अटक
तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट नोटा पुरवणाऱ्या नवी मुंबईतील आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा येथून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. अशाप्रकारे बनावट नोटा प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 2070 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या नोटा 500 रुपयांच्या आहेत.
आणखी एका आरोपीचा शोध
या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बनावट नोटा प्रकरणात दिल्लीतील एका गुन्हेगाराचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या तपासामुळे बनावट नोटा छापून त्या बाजारात चालवणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनतेने अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.