पुणे, 26 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर पोलिसांनी मागील वर्षभरातील विविध अंमली पदार्थविरोधी मोहिमांमध्ये जप्त केलेले 800 किलो अमली पदार्थ अधिकृतरित्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अमली पदार्थांची बाजारातील अंदाजे किंमत 8 कोटी रुपये आहे. सर्व आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा साठा नष्ट केला जात आहे. याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1904539804659855511?t=HLmNmq8UQivDClCZlmnqXw&s=19
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “आज आम्ही 8 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करत आहोत. या प्रक्रियेसाठी न्यायालयाची मंजुरी घेण्यात आली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडत आहे. सर्व नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाली असून, हा जप्त साठा आता रांजणगाव येथील सुविधा केंद्रात हलवला जात आहे, जिथे तो जाळून नष्ट केला जाईल.”
ड्रग्स विरोधात पोलिसांची मोहीम
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे शहरात अमली पदार्थांचा वाढता वापर रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून मागील काही महिन्यांपासून अनेक मोहिमा राबवण्यात येत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, अनेक तस्कर आणि पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या मोहिमेत पुणे शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली आहे.
पुण्याला ड्रग्समुक्त करणार: आयुक्त
दरम्यान, पुणे शहर पोलीस पुणे शहराला ड्रग्समुक्त करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहेत, असेही आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. आगामी काळात पोलिसांकडून अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असून, अमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्यात येणार आहेत, असे देखील पोलिसांनी सांगितले आहे.