मुंबई, 29 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीला पकडल्यानंतर कारवाई करण्यास झालेली दिरंगाई याला पोलीस आयुक्त जबाबदार असून, याप्रकरणी पुणे पोलीस पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पोलीस आयुक्तांचा राजीनामा सरकार घेणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते विधानसभेत बोलत होते. सोबतच विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पुण्यात पब आणि हॉटेल मालकांकडून पोलीस हफ्ता वसुली करीत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1806610218488659998?s=19
https://x.com/VijayWadettiwar/status/1806634619338395989?s=19
हॉटेल्स, पबकडून हप्ता गोळा केला जात असल्याचा आरोप
अपघात झालेली कार विना नंबर प्लेट रस्त्यावर कशी फिरली? पोलिसांच्या हे का लक्षात आले नाही? धनदांडग्याची कार असल्याने पोलिसांनी सोडली का? ह्या प्रश्नांचे उत्तर कोण देणार? असे सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले. शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यात शिक्षणासाठी विद्यार्थ्याना पाठवावे की नाही? याची पालकांना आता चिंता वाटायला लागली आहे. असे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले आहे. पुणे शहरात जवळपास 450 ओपन टेरेस हॉटेल आहेत. यामध्ये पुणे शहरातील प्रत्येक हॉटेल आणि पबकडून 5 लाख रुपयांचा हप्ता गोळा केला जातो. तसेच छोटी मोठी जी हॉटेल आहेत, त्यांच्याकडून 75 हजार ते 2.5 लाखांपर्यंतचा हप्ता गोळा करण्यात येत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला आहे.
विनापरवाना पब सुरू
पुणे शहरात अनेक पब अनधिकृतपणे, नियमांचे उल्लंघन करून चालत आहेत. यामध्ये पुण्यातील 27 पबला कोणताही परवाना नव्हता. विनापरवाना जर 27 पब चालत असतील तर पोलीस आयुक्तांचे लक्ष कुठे आहे? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. या संदर्भात पोलीस आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच यामध्ये ड्रग्सचे हप्ते , गुटख्याचे हप्ते, पबचे हप्ते तसेच हॉटेलचे हप्ते सुरू आहेत. त्यांचा रेट ठरवलेला आहे. त्यामुळे पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय होईल? याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.