पुणे, 17 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील उंड्री परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका फूड डिलिव्हरी रायडरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मझहर जिलानी शेख (34) असे या मृत डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याची माहिती पुणे शहर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिली माहिती
काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी पहाटे 3 वाजता झाला. मझहर शेख आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघे रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.
जखमीवर रुग्णालयात उपचार
त्यानंतर या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मझहर शेख या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पुणे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात हिट-अँड-रन प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसेच, अपघातस्थळाजवळील साक्षीदारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, मागील काही काळापासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यातील काही गुन्ह्यांमध्ये आरोपी सापडत आहेत, तर काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे ही गंभीर बाब आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवावे आणि अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.