पुणे, 01 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रात एक डोके, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळला होता. या हत्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे झाले आहेत. हा मृतदेह सकीना खान या 48 वर्षीय महिलेचा असून, या महिलेची हत्या तिच्या भावाने आणि वाहिनीने केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या महिलेच्या सख्ख्या भावाला आणि वहिनीला अटक केली आहे. असफाक खान असे मृत महिलेच्या भावाचे नाव आहे.
https://x.com/ANI/status/1830217052747157724?s=19
घराच्या मालकीच्या वादातून हत्या
दरम्यान, सकीना खान या महिलेची हत्या घराच्या मालकीवरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही मृत महिला पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात राहत होती. याठिकाणी असलेले घर या महिलेच्या नावावर होते. या घराची मालकी आपल्या नावावर करावी, यासाठी या आरोपी असफाक खान आणि सकीना खान यांच्यात यापूर्वी बऱ्याचवेळा वाद झाला होता. तर याच घराच्या मालकीवरून असफाक खानने आपल्या सख्ख्या बहिणीची हत्या केली. या गुन्ह्यात त्याला त्याच्या पत्नीने साथ दिली. त्यानंतर या दोघांनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे तुकडे करून ते मुठा नदी फेकून दिले. ही महिला गायब झाल्यानंतर शेजार्यांना संशय आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
26 तारखेला मृतदेह आढळला होता
याप्रकरणात पोलिसांनी असफाक खान आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमानुसार हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. तत्पूर्वी, पुण्यातील खराडी जवळील मुळा मुठा नदीपात्रात 26 ऑगस्ट रोजी एका महिलेचा डोके, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या मृतदेहाला डोके, हात आणि पाय नसल्यामुळे पोलिसांसमोर या महिलेची ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु, पुणे शहर पोलिसांनी काही दिवसांतच या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात पुणे शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.