पुणे ड्रॅग्ज प्रकरण; दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन

पुणे, 24 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील एका बारमध्ये काही तरूण अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

https://x.com/mohol_murlidhar/status/1805090412371251223?s=19

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ

दरम्यान, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एल 3 लिक्विड लीजर लाउंज या बारमध्ये काही तरूण अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे एका व्हिडिओमधून उघडकीस आले होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर केलेल्या या व्हिडिओत, फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या या बारमध्ये काही तरूण अंमली पदार्थांचे सेवन करत बसलेले दिसत आहेत, तर यावेळी अनेकजण मोठ्या आवाजातील संगीताच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. रविवारी (दि.23) पहाटे हा प्रकार घडला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पाच जणांना अटक

त्यानंतर पुणे पोलिसांनी या अमली पदार्थांच्या सेवन प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये सबंधित बारचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकारानंतर एल 3 लिक्विड लीजर लाउंज हा बार सील करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित केले आहे.

मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट

यासंदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केले आहे. “पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून, ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी, पूर्ण पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधात पुणे पोलिसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे. सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणे येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत.”असे मुरलीधर मोहोळ यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *