बारामती, 1 फेब्रुवारीः क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या गटात पुणे विभागाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत वर्चस्व राखले.
या शालेय राज्यस्तर बेसबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर व पुणे असे आठ विभागांचे 19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन 28 जानेवारी 2023 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, महेश चावले, उपप्राचार्या वैशाली माळी आदी उपस्थित होते.
मुलांच्या गटात अनुक्रमे पुणे, लातूर व कोल्हापूर विभाग यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तर मुलींच्या गटात अनुक्रमे पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद विभाग यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या स्पर्धेतील विजेत्यांना चषक, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
One Comment on “राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धेत पुणे विभाग प्रथम”