पुणे, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे एकूण 67 रुग्ण आढळले असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांनी दिली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महापालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुसार ज्या भागात या आजाराचे जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या भागांमध्ये उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच, पुणे महानगरपालिका प्रशासन या संदर्भात सतर्क असल्याचे वैशाली जाधव यांनी सांगितले.
https://x.com/ANI/status/1882539438313791909?t=vTS3E0SB4_wsyzQLM4FY0w&s=19
67 रुग्णांची नोंद
जाधव यांनी पुढे सांगितले की, “23 जानेवारी रोजी गुइलेन-बॅरे सिंड्रोमची 67 प्रकरणे समोर आली आहेत. या परिस्थितीचा तपास करण्यासाठी चार विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.” पुणे महानगरपालिकेने ज्या भागांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण अधिक आढळले आहेत, त्या भागांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. “त्याचबरोबर, त्या संबंधित भागात राहणाऱ्या लोकांमध्ये आजाराबाबत जागृती निर्माण करण्याचे कामही चालू आहे,” असे जाधव यांनी नमूद केले.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे –
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आणि गंभीर आजार आहे. यामध्ये शरीराची प्रतिकारशक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू अशक्त होणे आणि हालचालींमध्ये अडचण येणे यासारखी लक्षणे दिसतात. या आजाराचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. हा आजार व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गानंतर होऊ शकतो. ज्यामुळे हात, पाय, किंवा पाठीला सुन्नपणा व अशक्तपणा जाणवणे. तसेच स्नायूंचा कमकुवतपणा, जो हळूहळू वाढतो. चालण्यात किंवा हालचाली करण्यात अडचण येते. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासात समस्या निर्माण होते. यामध्ये चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होणे, बोलणे किंवा चघळणे कठीण होऊ शकते.
काळजी घेण्याचे आवाहन
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना या आजाराची लक्षणे जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य विभागाने संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत लक्ष ठेवले जात आहे. यासोबतच, गुइलेन-बॅरे सिंड्रोमबाबत अधिकाधिक जनजागृती करण्यात येत असून नागरिकांमध्ये भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.