पुणे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलाला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे, 11 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आई आणि अन्य एका व्यक्तीला पुणे जिल्हा न्यायालयाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या विरोधात आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातावेळी हा मुलगा मद्यधुंद अवस्थेत वेगात कार चालवत होता. तसेच त्याच्या कारला त्यावेळी नंबर प्लेट देखील नसल्याचे समोर आले होते. दरम्यान, या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1800131643237404980?s=19

रक्ताच्या नमुन्यात फेरफार?

या अपघातानंतर मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार दिल्याप्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. तर या आरोपीचे वडील विशाल अग्रवालला देखील याच प्रकरणात पोलिसांनी 2 जून रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एकदा ताब्यात घेतले होते. या अल्पवयीन मुलाच्या आई आणि वडिलाने पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्या मुलाच्या रक्तामध्ये दारूचा अंश सापडू नये, यासाठी त्यांनी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सोबत घेऊन त्याच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केली असल्याचा पुणे पोलिसांना दाट संशय आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

या अपघात प्रकरणी अनेकांवर कारवाई

तर पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह एका आरोपीला आता पुण्यातील कोर्टाने 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी सध्या बाल सुधारगृहात आहे. या प्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टरांना तसेच एका वार्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली गेली आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत आरोपीचे आई, वडील, आजोबा, ससून रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्ड बॉय यांच्यासह पुण्यातील पब मॅनेजमेंट टीममधील काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच येरवडा पोलीस स्टेशन मधील दोन अधिकाऱ्यांना देखील याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *