पुणे कार अपघात प्रकरण; दोन्ही डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन वरिष्ठ डॉक्टर आणि एका वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची आज पोलीस कोठडी समाप्त झाली होती. त्यामुळे या तिघांना आज पुणे जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी डॉक्टर अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि वॉर्ड बॉय अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत 5 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1796148214875189381?s=19

5 जूनपर्यंत पोलीस कोठडी 

तत्पूर्वी, या अपघातातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून खोटा अहवाल सादर केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील हे दोन्ही डॉक्टर आणि वॉर्ड बॉयला एसआयटी समितीने निलंबित केले आहे. सध्या त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान या तिघांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी पुणे पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार कोर्टाने या तिघा आरोपींना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पुणे कार अपघाताच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला पुणे पोलिसांचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

https://twitter.com/ANI/status/1796154133684125791?s=19

10 जणांना अटक

पुणे कार अपघात प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये या अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा, डॉक्टर, वॉर्ड बॉय, पब मालक यांच्यासह 10 जणांचा समावेश आहे. सध्या ते सर्वजण तुरूंगात आहेत. तर याप्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर सध्या या अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *