पुणे, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर पोलिसांनी शनिवारी (08 मार्च) सार्वजनिक ठिकाणी अशोभनीय वर्तन केल्याच्या आरोपाखाली एका लक्झरी कारचालकाला अटक केली. आरोपी गौरव आहुजा असे या आरोपीचे नाव असून, त्याला सातारा जिल्ह्यातील कराड येथून अटक करण्यात आली आहे. तो ही घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. काही दिवसांपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. त्याला आता अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
https://x.com/ANI/status/1898593203424772409?t=rzhrkEke05Nz4RLyocX0MA&s=19
प्रकरण काय आहे?
आरोपी गौरव आहुजा आणि त्याच्या सोबत असलेली आणखी एक व्यक्ती शनिवारी सकाळी बीएमडब्ल्यू कारमधून जात असताना, त्यांनी पुण्यातील येरवडा चौकात त्यांची कार थांबवली. त्यावेळी आहुजाने कारमधून उतरून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली. त्याचवेळी एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोपीच्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे.
गुन्हा दाखल
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आहुजावर भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम 270, 281, 285 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला. त्यामध्ये आरोपीने गाडी रस्त्यावर थांबवून सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचे दिसते. त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकाने त्याला जाब विचारला असता, आरोपीने आक्षेपार्ह वर्तन केले.”
आज कोर्टात हजर करणार
या प्रकरणी पोलिसांनी आहुजाला ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी गौरव आहुजाला अटक केल्यानंतर त्याला आज (09 मार्च) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू असून, फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत आहे.