पुणे, 08 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) ह्युमन मेटान्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) आजाराचे रुग्ण सध्या जगभरात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एचएमपीव्ही विषाणूसंदर्भात आरोग्य विभागाकडून प्राथमिक मार्गदर्शक तत्वे प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. तसेच पुणे जिल्हा प्रशासन या विषाणूविषयी प्रशासन सतर्क झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आज (दि.08) सकाळी आरोग्य विभाग व महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांची सविस्तर बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
https://x.com/ANI/status/1876629791773982734?t=G8N6seCHH__hM3RCJMGyXg&s=19
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
एचएमपीव्ही च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांची आज सविस्तर बैठक घेतली जाईल. या बैठकीत मार्गदर्शक सूचनांचा तपशील प्रशासकीय यंत्रणेला दिला जाईल आणि त्याची अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर करण्यात येईल. यामध्ये नागरिकांना या विषाणूबद्दल आवश्यक माहिती पुरवणे आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी लागणारी औषधे व इतर तयारी तत्काळ पूर्ण करणे यावर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.
घाबरू नका पण काळजी घ्या
सध्याच्या स्थितीनुसार घाबरण्यासारखे काही नाही. मात्र, कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. औषधे आणि मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आरोग्य विभाग सज्ज ठेवण्यात येईल, जेणेकरून संभाव्य रुग्णांची देखभाल तत्काळ करता येईल. प्रशासनाची प्राथमिकता मार्गदर्शक तत्वांचे पालन करून आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवणे आणि नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे असल्याचे जितेंद्र डुडी यांनी सांगितले. सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. पुणे जिल्ह्यात कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास आमचे आरोग्य विभाग तत्पर असेल, विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच एचएमपीव्ही बाबत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.