पुणे, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील हडपसर परिसरातील मार्व्हल बाऊंटी सोसायटी येथे एका फ्लॅटमध्ये तब्बल 300 मांजरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील रहिवाशांनी वाढत्या अस्वच्छतेबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत संबंधित फ्लॅटमालकाला नोटीस बजावली आहे.
https://x.com/ANI/status/1891523690774532104?t=-Im1iL-q6_ow6Tyv0B-GgA&s=19
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोसायटीतील 9 व्या मजल्यावर महिला राहत होती. ही महिला रस्त्यावरील भटकी मांजरे घरी आणून त्यांची देखभाल करत होती. तसेच ही मांजरे निरोगी झाल्यावर त्यांना ती सोडून देत असे. मात्र, त्यामुळे या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात मांजरे जमा झाली. अशा परिस्थितीत संपूर्ण सोसायटीमध्ये दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढली, अशी रहिवाशांची तक्रार आहे.
महापालिकेने दिला 2 दिवसांचा अल्टिमेटम
या प्रकरणावर पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांनी सांगितले की, ‘‘फ्लॅटमालकाने मोठ्या प्रमाणात मांजरे ठेवली असल्याने दुर्गंधी पसरत आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या पथकाने फ्लॅटची पाहणी करून फ्लॅटमालकाला नोटीस बजावत दोन दिवसांत मांजरे सोडण्याचे आदेश दिले आहेत.’’ यावेळी पोलिसांनी सांगितले की, अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र वरिष्ठ अधिकारी व महापालिका प्रशासनाशी चर्चा करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, महापालिकेच्या ताब्यात आलेली मांजरे पुनर्वसनासाठी नेण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्राणीप्रेम आणि स्वच्छता यांच्यात समतोल आवश्यक!
या प्रकारामुळे प्राण्यांच्या देखभालीबाबत आणि सोसायटीतील स्वच्छतेबाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्राणीप्रेम महत्त्वाचे असले तरी सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे मत अनेक रहिवाशांनी व्यक्त केले आहे.