पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण, मोदी शहांनी वाहिली श्रद्धांजली

दिल्ली, 14 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीर मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज (दि.14) सहा वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करताना अमित शहा यांनी दहशतवादाला संपूर्ण मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू म्हणत कठोर भूमिका व्यक्त केली.

https://x.com/AmitShah/status/1890220972860666100?t=jENqfj5v6w6sI-DeVsLjDw&s=19

अमित शहा यांचे ट्विट

“आजच्या दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दहशतवाद हा मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू असून संपूर्ण जग त्याच्या विरोधात एकवटले आहे,” असे त्यांनी म्हटले. भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक, मोदी सरकार दहशतवाद्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरणातून मोहीम चालवून त्यांचा समूळ नाश करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे अमित शहा यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://x.com/narendramodi/status/1890237167521395069?t=CSKtNtOPxqFc86R17kAytQ&s=19

पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली आहे. “2019 मध्ये पुलवामामध्ये गमावलेल्या शूर वीरांना श्रद्धांजली. त्यांच्या बलिदान आणि देशप्रेमाला येणारी पिढी कधीही विसरणार नाही,” असे पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

40 भारतीय जवान शहीद

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर पाकिस्तान मधील दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. स्फोटकांनी भरलेली एक गाडी जवानांच्या बसला धडकली, ज्यामुळे 40 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर भारताने 26 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच त्यांच्या तळांची नासधूस करण्यात आली आणि दहशतवादी कॅम्पस् देखील नष्ट करण्यात आले होते. पुलवामा हल्ल्याला 12 दिवस होण्यापूर्वीच भारतीय हवाई दलाने ही मोठी कारवाई केली होती. दरम्यान, आज पुलवामा हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होत असताना, संपूर्ण देश या वीर जवानांना कृतज्ञतेने श्रद्धांजली वाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *