बारामतीत प्रहार शिक्षक संघटनेचा सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा

बारामती, 03 मे: (विश्वजीत खाटमोडे) प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार शिक्षक संघटनेने बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाठवले आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/1786282212813689071?s=19

पाठिंबा पत्रात काय म्हटले?

बारामती लोकसभा मतदारसंघातील 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठींबा देण्यात येत आहे. दि.1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसह शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आपण वेळोवेळी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे व जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे अभिवचन दिल्याने संघटनेच्या वतीने हा जाहीर पाठींबा देण्यात येत आहे.



जो पर्यंत जुनी पेन्शन योजना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला लागू होत नाही, तोपर्यंत या प्रमुख मागणीसाठी संघटनेसोबत अविरत संघर्ष करण्याची ग्वाही देखील आपण दिल्याने आपले आभार व्यक्त करतो. सदरील निवडणुकीत बारामती मतदारसंघातील सर्व संघटनेचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व डीसीपीएस किंवा एनपीएस योजनेतील सर्व शिक्षक व महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद आपल्याला संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास देतो. आपणास विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! असे महेश ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *