मुंबई, 19 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील श्री राम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना राम मंदिराचा सोहळा पाहता येणार आहे. यासंदर्भातील आदेशाचे पत्र राज्य सरकारने जारी केले आहे. तर याच्याआधी केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 22 जानेवारी रोजी अर्धा दिवसांची सुट्टी दिली होती.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1748310177919455729?s=19
महाराष्ट्रासह या राज्यात 22 तारखेला सुट्टी
अयोध्या येथील भगवान श्री राम यांच्या मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, काही राज्यांत 22 जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा यांसारख्या अनेक राज्यांतील सरकारने सुट्टी जाहीर जाहीर केली होती. त्यानंतर आज महाराष्ट्र राज्य सरकारने देखील 22 जानेवारीला सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक नेत्यांनी केली होती मागणी
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सरकारी आणि खाजगी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी राज्यातील अनेक नेत्यांनी केली होती. यासंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले होते. राज्य सरकारने त्यांच्या पत्राची दखल घेऊन सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अतुल भातखळकर यांनी आता ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.