शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश

मुंबई, 26 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आढळराव पाटील हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांच्या प्रवेशामुळे आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघातून आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे.

https://twitter.com/mahancpspeaks/status/1772603014576288163?s=19

शिरूरची जागा राष्ट्रवादीकडे

दरम्यान, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. यासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. तर शिरूर मतदार संघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत ही जागा आता राष्ट्रवादीकडे जाणार असल्यामुळे आढळराव पाटील यांनी आता शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आढळराव पाटील हे आता आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवताना दिसतील.

आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द

दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते 2004 मधील लोकसभा निवडणूकीत शिवसेनेच्या तिकिटावर शिरूर मतदार संघात पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आढळराव पाटील यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत देखील विजय मिळवला. मात्र 2019 च्या निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *