पिंपरी चिंचवड, 18 जानेवारीः मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या तब्बल 21 वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
सदर वाहनांची पाहणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 2 ते 15 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहणार आहेत. जाहीर ई-लिलावात बस, एचजीव्ही, एमजीव्ही, एलजीव्ही, पीक अप, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे.
उंडवडी सुपे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवसाचे आयोजन
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचना फलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे. जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 2 ते 10 फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत https: //eauction. gov. in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.
कऱ्हा नदीच्या पुलाचा पैसा पाण्यात!
ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर 2 ते 13 फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 प्रत्येक वाहनासाठी 50 हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष ‘डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड’ या नावे सादर करावा. सोबत ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.
One Comment on “जप्त वाहनांचा जाहीर ई-लिलाव”