बारामती, 20 जुलैः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज उभारावे, असे आवाहन बारामती नगर परिषदेने शहरातील नागरिकांना केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभुमीवर, जनतेच्या मनात या स्वतंत्र लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे, आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते 18 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविणे बाबत केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाद्वारे सूचित करण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने बारामती शहरातील प्रत्येक शासकीय/ निमशासकीय कार्यालये, शाळा/ महाविद्यालये, खाजगी संस्था यांनी आपल्या कार्यालयासमोर तसेच शहरातील प्रत्येक नागरिकाने आपापल्या घरासमोर राष्ट्रध्वज उभारावा, असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. राष्ट्रध्वज हे हाताने तयार केलेले अथवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क किंवा खादी पासून बनविलेले असावेत. तसेच सदर कार्यवाही करत असताना भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
तसेच आपण उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे तसेच इतर उपक्रमांचे छायाचित्रे, चित्रफिती, आदी केंद्र शासनाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावेत. राष्ट्रध्वज उपलब्ध होत नसलेस बारामती नगरपरिषद (टेलि. नं. 02112-222494/222307) येथे संपर्क साधावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.