सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत निषेध आंदोलन, फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

बारामती, 28 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ तसेच राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज बारामती येथे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील तीन हत्ती चौक याठिकाणी पार पडले. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांनी यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

https://x.com/supriya_sule/status/1828741259743068462?s=19

https://x.com/supriya_sule/status/1828741293926687104?s=19

फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये ही वाढ होत आहे. याशिवाय राज्यातील पोलिसावर कोयता गँगने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यातील सध्याची परिस्थिती पाहून गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा नैतिकतेवर राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. महिला अत्याचारांच्या घटना रोखू न शकणाऱ्या फडणवीसांचा आम्हाला राजीनामा हवाय. त्यातील नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा त्या यावेळी म्हणाल्या.

https://x.com/NCPspeaks/status/1828739195629928625?s=19

https://x.com/NCPspeaks/status/1828739164017459514?s=19

सरकारने जबाबदारी घ्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी

बारामतीत अशा प्रकारचे आंदोलन करावे लागणे हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी व महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्या विरोधात का आवाज उचलू नये? असा सवाल त्यांनी यावेळी केला. आम्हाला दीड हजार नको सुरक्षितता हवी अशी भावना आता महिलांच्या मनात आहे. लोकसभेच्या निकालानंतर बहिण लाडकी झाली. सरकारला वाटतं नाती पैशांनी विकत घेता येतात पण तसं नाही. बहिणींचे नाते त्यांना कळालेच नाही, अशी टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली. तसेच नौदलामुळे ही घटना घडली असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यांच्यावर ते आरोप करतात. या घटनेची राज्य सरकारने त्याची जबाबदारी घ्यायला हवी. छत्रपतींचा पुतळा बनवणाऱ्या कंत्राटदाराची पूर्णपणे चौकशी व्हावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *