शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची करोडोंची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

मुंबई, 18 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा याची जवळपास 98 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. बिटकॉईन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक (पीएमएलए) कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तेत शिल्पा शेट्टीच्या नावावरील जुहू येथील फ्लॅटचा देखील समावेश आहे. तसेच यामध्ये पुण्यातील एक बंगला आणि राज कुंद्राच्या नावे असलेले अनेक इक्विटी शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती ईडीने स्वतः ट्विट करून दिली आहे. या कारवाईमुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दांपत्याला मोठा धक्का बसला आहे.

बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी कारवाई

तत्पूर्वी, महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याप्रकरणी, महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांनी व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिंपी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन करोडो रुपयांचे बिटकॉईन्स मिळवले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात राज कुंद्रा याचा देखील सहभाग आहे. त्यामुळे ईडीने त्याची आज 97.79 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. तर या प्रकरणाचा तपास सध्या ईडी करीत आहे.

राज कुंद्रा सततच्या वादामुळे चर्चेत

राज कुंद्रा आणि वाद काही नवीन नाही. या वादामुळे राज कुंद्रा अनेकदा चर्चेत असतो. सुरूवातीला राज कुंद्रा हा आयपीएलच्या सट्टेबाजीत अडकला होता. त्यावेळी तो राजस्थान रॉयल्स या आयपीएल मधील संघाचा मालक होता. मात्र, सट्टेबाजी प्रकरणात नाव आल्यामुळे त्याला राजस्थान रॉयल्स संघाची मालकी सोडावी लागली होती. तर काही वर्षांपूर्वी राज कुंद्रा याचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात ही आले होते. तेंव्हा पोर्नोग्राफी प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्याला या प्रकरणातून काही महिन्यानंतर जामीन मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *