दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर! 8 ते 10 दिवस लवकर परीक्षा होणार?

पुणे, 13 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या काळात होणार आहे. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने निवेदनातून दिली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी आणि अभ्यासाचे नियोजन करता यावे, यासाठी शिक्षण मंडळाकडून दरवर्षी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते.

या तारखांना परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येते. यामध्ये बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात आणि दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा. तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचा निकाल लवकर जाहीर करण्यात यावा. त्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 8 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा शिक्षण मंडळाचा मानस आहे. त्यानुसार शिक्षण मंडळाने परीक्षेच्या या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे. तर बारावीची तोंडी परीक्षा 14 जानेवारी ते 10 फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या काळात होणार आहे. तर त्यांची तोंडी परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

सूचना व हरकती नोंदविण्याचे आवाहन

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या 23 ऑगस्ट 2024 पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. दरम्यान या संभाव्य तारखा असून दहावी आणि बारावीच्या तोंडी आणि लेखी परीक्षांचे सर्व विषयांचे वेळापत्रक सविस्तर व स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ही शिक्षण मंडळाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *