वायनाड, 23 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक पार पडणार आहे. या मतदासंघात 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून प्रियंका गांधी या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत त्यांचा सामना भाजपच्या नव्या हरिदास यांच्याशी होणार आहे.
https://x.com/priyankagandhi/status/1849036807146479919?t=C7sLdbCne9a2KrxUkS6vKA&s=19
https://x.com/AHindinews/status/1848990042213257419?t=bvCusTcrymi4Y9fo42frtg&s=19
प्रियंका गांधींचा रोड शो
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियंका गांधी यांचा आज वायनाडमध्ये रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये प्रियंका गांधी यांच्यासोबत त्यांचे भाऊ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पती रॉबर्ट वाड्रा सहभागी झाले होते. त्यानंतर प्रियंका गांधी यांची वायनाड येथे जाहीर सभा पार पडली. “गेली 35 वर्षे मी वेगवेगळ्या निवडणुकांसाठी प्रचार करत आहे. मी पहिल्यांदाच तुमचा पाठिंबा मागत आहे. ही खूप वेगळी भावना आहे. मला वायनाडमधून उमेदवार होण्याचा बहुमान दिल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा खूप आभारी आहे,” असे प्रियंका गांधी यांनी या प्रचारसभेत म्हटले आहे.
राहुल गांधींनी राजीनामा दिला होता
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही जागांवर राहुल गांधींनी विजय मिळवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा निर्णय घेतला. तर त्यांनी वायनाड येथून खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वायनाडच्या जागेवर येत्या 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.