मुंबई, 22 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या कार्यालयातून 40 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आशिष बुटीराम सायाळ (32) याला जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आले असून, चोरीला गेलेल्या रकमेपैकी 34 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पन्हाळे यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1892977416387338440?t=9B-1JpZsC-R3M0GB_nl_CQ&s=19
काय आहे प्रकरण?
आशिष सायाळ हा गेली नऊ वर्षे संगीत दिग्दर्शक प्रीतम यांच्या मुंबईतील स्टुडिओत काम करीत होता. 4 फेब्रुवारी रोजी त्याने स्टुडिओतून 40 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला. या रकमेसह तो प्रीतम यांच्या घरी जात असल्याचे त्याने सांगितले होते. ही चोरी उघडकीस आल्यानंतर प्रीतम यांचे व्यवस्थापक विनीत छेडा यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी काही दिवसांपूर्वी ऑफिस मधील कामासाठी ही रक्कम ठेवली होती.
चोरीच्या दिवशी विनीत छेडा काही वेळासाठी प्रीतम यांच्या घरी काही कागदपत्रांवर सही घेण्यासाठी गेले होते. परत आल्यानंतर या पैशांची बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, आशिष सायाळ ती बॅग घेऊन प्रीतम यांच्या घरी जात असल्याचे सांगून गेला होता. त्यानंतर सायाळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद येत होता. त्यानंतर विनीत छेडा थेट आशिष सायाळच्या घरी गेले, मात्र तो तिथेही नव्हता. यामुळे त्यांनी तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिली माहिती
त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. परिसरातील 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर त्याला जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आले. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार पन्हाळे यांनी अधिक माहिती दिली. “या आरोपीने 40 लाख रुपयांची बॅग चोरली आणि तो पळून गेला. तो आधी वर्सोव्याला गेला. तिथे त्याने चोरीच्या पैशातून दीड लाख रुपयांचा आयफोन घेतला. मग तो जम्मूमध्ये त्याच्या बायकोकडे गेला. पोलिसांनी त्याला जम्मूमध्ये अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेले 34 लाख रुपये परत मिळवले. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अजूनही तपास करीत आहेत. या चोरीमध्ये आणखी कोण सामील आहे का? आणि या आरोपीने याआधी काही गुन्हे केले आहेत का? याचा देखील तपास पोलीस करीत आहेत.