पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर! मेट्रो ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन करणार

पुणे, 25 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी (दि.26) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुणे शहराला भेट देणार आहेत. यावेळी उद्या सायंकाळी सहाच्या सुमारास ते पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते स्वारगेट या भुयारी मेट्रो ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते 22,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

https://x.com/PIBMumbai/status/1838881568389226576?s=19

मोदींचा पुणे दौरा

दरम्यान, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनामुळे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. तर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो प्रकल्पाला अंदाजे 1,810 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याशिवाय सुमारे 2,950 कोटी रुपये खर्चून विकसित होणाऱ्या पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. सुमारे 5.46 किमी लांबीचा हा दक्षिणेकडील मार्ग पूर्णपणे भुयारी आहे, ज्यामध्ये मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके आहेत. त्याचबरोबर पुण्यातील भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.

https://x.com/DheerajGhate/status/1838604475897946184?s=19

सभेवर पावसाचे सावट!

दरम्यान, या कार्यक्रमानंतर पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर उद्या पंतप्रधान मोदींची सभा पार पडणार आहे. परंतु त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट आहे. कारण, पुणे शहरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेच्या तयारीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पंतप्रधानांची ही सभा यशस्वी पार पाडावी, यासाठी सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी पार पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *