यवतमाळ, 28 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज यवतमाळ येथे होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध रेल्वे मार्ग आणि रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोबतच आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
2023-24 या वर्षात 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17 लाख 728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, 7 लाख 03 हजार 497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आज विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामध्ये वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब या 39 किमी लांबीचा रेल्वे मार्ग व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या बीड जिल्ह्यातील न्यु आष्टी ते अंमळनेर या 32.84 किमी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे.
रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 किमी दुपदरी रस्ता, 378 कोटी रूपये खर्च असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सलाई खुर्द – तिरोडा महामार्गावरील 42 किमी लांबीचा रस्ता क्राँक्रीटीकरण, तसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या यवतमाळ वरोरा – वणी महामार्गावरील 18 किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.