पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर! अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

मुंबई, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदी उद्या दुपारी 12:15 वाजता नाशिकमध्ये पोहोचतील. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान दुपारी 3:30 वाजता मुंबईत येतील. यावेळी पंतप्रधान मोदी हे अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी 4:15 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई मधील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार आहे. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

https://twitter.com/PIB_India/status/1745323607809839417?s=19

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

दरम्यान, नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी 12 ते 16 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो. तर यंदा हा महोत्सव महाराष्ट्रातील नाशिकमध्ये पार पडणार आहे. नाशिक येथील महोत्सवात देशभरातून सुमारे 7,500 युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, देशी खेळ, घोषणा आणि विषयावर आधारित सादरीकरण, युवा कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथा लेखन, युवा संमेलन, खाद्य महोत्सव आदींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. राष्ट्रीय युवा महोत्सव एक मंच तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे भारतातील विविध प्रदेशातील तरूण त्यांचे अनुभव शेअर करू शकतील. तसेच ते एक भारत आणि श्रेष्ठ भारताच्या भावनेने संयुक्त राष्ट्राचा पाया मजबूत करू शकतील.

मुंबईत उद्या अटल सेतूचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा सागरी पूल 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा पूल सुमारे 21.8 किमी लांबीचा असून तो 6 लेनचा पूल आहे. या सागरी पुलाची समुद्रावरील लांबी सुमारे 16.5 किमी आहे. तर हा पूल जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांब आहे. दरम्यान, हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. यासोबतच मुंबई ते पुणे, गोवा येथील प्रवासाला देखील कमी वेळ लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *